भोपाळ – देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. रुग्णाला रुग्णालयात बेड मिळत नसल्यावर रुग्णाचे नातेवाईक काहीही करण्यास तयार होतात. त्यातच ती व्यक्ती प्रिय असेल तर विचारूच नका. भोपाळमधून अशीच एक घटना समोर आली असून येथे एकाने आपल्या पत्नीच्या उपचारासाठी चक्क रुग्णवाहिकाच पळवली.
आपल्या प्रियजनांच्या उपचारांसाठी काहीही करण्याच्या मनस्थितीमधून अनेकदा हातून गुन्हेगारी कृत्य घडतं. सध्या देशभर करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एका तरुणाचा संयम संपला आणि त्यानं करोनाची लागण झालेल्या गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी चक्क ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिकेचं अपहरण केलं. मध्य प्रदेशातील विदीशामध्ये ही घटना घडली.
पुतली घाट परिसरातील कुशवाह कुटुंबातील गर्भवती महिला 4 दिवसांपूर्वी करोना पॉझिटीव्ह आली होती. या महिलेच्या पतीनं ऑक्सिजनच्या सिलेंडरची व्यवस्था केली होती. मात्र आपल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होती. मात्र बेड नसल्याचे रुग्णालयाने सांगितले होते. त्यानंतर त्याने रुग्णवाहिका घरी बोलवून रुग्मवाहिकेचे अपहरण केलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मध्यस्थी केली. त्यानंतर रुग्णालयाने त्याच्या पत्नीला दाखल करून घेतलं.
दरम्यान शुक्रवारी रात्री 11 पासून अॅम्बुलन्स घरी पाठवावी अशी विनंती हॉस्पिटलकडं करत होतो. मात्र दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता अॅम्बुलन्स घरी पोहचली. त्यामुळं आपण अपहरणाचं टोकाचं पाऊल उचलल्याचं तरुणाने म्हटलं.