नातेवाइकांच्या पायाला भिंगरी : प्रशासनाचा गाफीलपणा बेततोयं रुग्णांच्या जिवावर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये गंभीर रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे गुरुवारी एकही रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक नव्हते. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही शहरातील रुग्णालये व मेडिकल स्टोअरवर नातेवाईक गर्दी करत आहेत. मात्र तरीही रेमडेसिवीर मिळत नसल्याने शहरातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे निघाली आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे गुरुवारी एकही रेमडेसिवीर शिल्लक नव्हते. रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालय प्रशासनाकडून रेमडेसिवीर बाहेरून आणण्यासाठी सांगितले जाते. मात्र बाहेरील मेडिकल स्टोअरमध्येही रेमडेसिविर शिल्लक नसल्याने रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या इंजेक्शनसाठी पुणे शहरातील रुग्णालये व मेडिकल स्टोअर गाठत आहेत, मात्र तिथेही इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहेत.
शहरातील गंभीर रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरुवारी दुपारी शहरामध्ये तब्बल 335 रुग्णांची प्रकृती गंभीर होती. तर 222 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर उपयुक्त ठरत आहे. गंभीर रुग्णाला साधारणपणे 3 रेमडेसिवीर इंजेक्शऩ दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे वैद्यकिय तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार, गंभीर रुग्णांवर उपचार करतेवेळी डॉक्टर नातेवाईकांना रेमडेसिवीर आणण्यास सांगत आहेत.
वास्तविक पाहता शासनाने खासगी व महापालिका रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करतेवेळी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करण्याचा आदेश काढला आहे. मात्र या आदेशाला न जुमानता नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे नातेवाइकांची मोठी धावपळ सुरू आहे.
हेल्पलाइनच निरुपयोगी
रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 020-2612 3371 हा नंबर देण्यात आला आहे. मात्र हा नंबर सातत्याने व्यस्त लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांना या हेल्पलाईनचा काहीच फायदा होत नसल्याने ही हेल्पलाइन निरुपयोगी असल्याने संतप्त आक्षेप रुग्णांचे नातेवाईक नोंदवित आहेत.
पालिकेकडे आज एकही रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक नाही. आपण मागणी केली आहे. त्यानुसार आज सायंकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. त्यानंतर खासगी रुग्णालयांना द्यायचे की नाही अथवा किती द्यायचे याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. मात्र सध्यातरी आपल्याकडे इंजेक्शन शिल्लक नाहीत
– डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिं.चिं. मनपा.
माझ्या कुटुंबामध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत. वडील आयसीयूमध्ये आहेत, भावाला ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. इतर दोघेही पॉझिटिव्ह आहेत. मला 18 रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता आहे. आतापर्यंत मी 10 रेमडेसिवीर उपलब्ध करू शकलो आहे. अजून 8 आवश्यक आहे. मात्र ते मिळविण्यासाठी मी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सगळे हॉस्पिटल पायाखाली घातले आहेत. कुठेही इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
– रुग्णाचे नातेवाईक