“ज्यांनी इतरांच्या घरात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु”

भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर घणाघाती टीका

पंढरपूर: राज्यात एकीकडे कोरोनाचा थैमान पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. १७ एप्रिलला याठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली. राष्ट्रवादीनं गोरगरिब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला अशा शब्दात त्यांनी आरोप केले.

सभेत गोपीचंद पडळकर म्हणाले की, ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो. मेंढ्याचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसते. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळे गरीब तोंडाचा गृहमंत्री बघतात. त्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था आहे असा टोला त्यांनी लगावला. तसेच सचिन वाझे प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. शेवटी दिलीप वळसे पाटील या गरीबाला गृहमंत्रिपद दिले. राज्यात जे लोक सीबीआयला येऊ देणार नाहीत असं म्हणत होते त्याच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आता सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागत आहे असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

अजित पवार यांना काय झालंय माहीत नाही. परंतु ते अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. माझी शरद पवार यांच्यावरील पीएच.डी. अजून पूर्ण झाली नसली तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम. फील करणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की, हेच उपमुख्यमंत्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की हेच उपमुख्यमंत्री. सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच.. असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यात साखर कारखाने बिकट अवस्थेत आले की ते विकत घ्यायचा सपाटा पवार कुटुंब करीत आहेत. आता त्यांनी आपल्याकडील कारखान्याच्या माहितीची श्वेतपत्रिका काढावी. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही. आता मंत्र्यांची पुढे मालिकाच असून कोणाही भ्रष्ट मंत्र्याची सुटका नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.