हरिद्वार – देशावर करोनाचे संकट आहे. नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. अशातही उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात 50 लाखाहून अधिक जण सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याने येथे करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यातच आता कुंभमेळ्यात सहभागी झालेले महामंडलेश्वर कपिल देव यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असताना कपिल देव यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूनंतर कपिल देव यांचे पार्थिव मध्य प्रदेशमध्ये आणण्यात येणार आहे.
दरम्यान, हरिद्वार येथील कुंभमेळ्यात तब्बल 50 लाखाहून अधिक जणांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 1500 जणांचा करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मात्र, येथील गर्दी पाहता हा अकडा वाढण्याची शक्यता आहे.