ढाका – भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना बांगलादेशबद्दल फारशी माहिती नसल्याचे वक्तव्य बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्र ए के अब्दुल मोमेन यांनी केले असून अनेक बाबतींत आमची भारतापेक्षा चांगली स्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची एक मुलाखत प्रसिध्द झाली होती. बांगलादेशात पुरेसे अन्न नसल्यामुळे तेथील गरीब लोक भारतात येतात अशा आशयाचे विधान शहा यांनी केले होते. त्यावर मोमेन यांनी शहांना फारशी माहिती नसल्याचे म्हटले असून आम्हाला त्यांचे हे वक्तव्य अमान्य आहे. अशा विधानांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. भारतात 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे शौचालय नाहीत. मात्र बांगलादेशात 90 टक्के लोकांकडे शौचालय आहेत.
सुशिक्षित लोकांसाठी आमच्या देशात नोकरीच्या फार संधी नसतील मात्र अल्प शिक्षित लोकांसाठी बांगलादेशात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. रोजगारासाठी त्यांना भारतात जावे लागत नाही. त्यामुळे शहा जे बोलले ते पूर्णत: चुकीचे आहे.
जगात असे अनेक लोक असतात की ते पाहुनही दुर्लक्ष केल्यासारखे करतात. माहित असूनही माहिती नसल्यासारखे करतात. अमित शहा त्यापैकीच एक असल्याची टिप्पणी मोमेन यांनी केली. शहांना त्यांच्या देशाच्या स्थितीची चांगली कल्पना आहे. तेथे त्यांनी अगोदर सुधारणा करावी असेही मोमेन म्हणाले.