नवी दिल्ली – भारतात आणखी एका करोना लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या “स्पुटनिक-व्ही’ या करोना लसीला अखेर केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय औषध महानियंत्रक मंडळानेही (DCGI) परवानगी दिली आहे.
Drug Controller General of India (DCGI) has approved the use of the Russian Sputnik V vaccine against coronavirus in the country. India has become the 60th country to approve Sputnik V: Russian Direct Investment Fund
— ANI (@ANI) April 13, 2021
भारतात हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
रशियाच्या करोना लसीला 1 एप्रिलला परवानगी नाकारण्यात आली होती. या लसीबाबत आणखी माहिती देण्याची मागणी भारतीय औषध महानियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीज लॅबकडे केली होती. आता तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही समिती आता भारतीय औषध महानियंत्रक मंडळानेही (DCGI) परवानगी दिली आहे. त्यानंतर डीसीजीआय आरोग्य मंत्रालयाकडे परवानगी मागेल आणि त्यानंतर ही लस भारतात दिली जाईल. ही लस करोना विषाणू विरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे.
रशियाने सर्वात प्रथम या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होते. भारतात आतापर्यंत या लसीच्या 1 हजार 500 जणांवर चाचण्या झाल्या आहेत.
दरम्यान, भारतात सध्या ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आलेली पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि हैदराबादमधील भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे.