ShareMarketNews : निर्देशांकांची अतोनात हानी

मुंबई – देशात करोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी तुफान विक्री होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक साडेतीन टक्‍क्‍यांनी कोसळले. गेल्या आठवड्यापर्यंत शेअर बाजारांमध्ये उमेद होती. मात्र अपेक्षेपेक्षा रुग्णांची संख्या जास्तच वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी धीर सोडला. भारतात सध्या मोठ्या शहरांमध्ये आणि राज्य स्तरावर सुद्धा कमी अधिक प्रमाणात लॉक डाऊन सुरू झाले आहे. डॉ. रेड्डीज या औषधे निर्माण करणारी कंपनी वगळता सेन्सेक्‍स संबंधातील 29 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ घट झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1,707 अंकानी म्हणजे 3.44 टक्‍क्‍यानी कमी होऊन 47,883 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 524 अंकानी कमी होऊन 14,310 अंकावर बंद झाला.

इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, स्टेट बॅंक, महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. याबाबत जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अगोदर फक्त वित्तीय क्षेत्रावर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र आता माहिती तंत्रज्ञान, औषधी आणि ग्राहक वस्तू क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची विक्री होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.

एक -दोन आठवडे बाजारात संभ्रम राहण्याची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळामध्ये करोना आजार कोणते रूप धारण करतो यावर निर्देशांकांची पुढील दिशा अवलंबून राहील. मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्राचे निर्देशांक साडेसात टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. लवकरच कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्याआधारावर काही गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्यांतील गुंतवणूक संदर्भात निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.

छोट्या कंपन्या पीछाडीवर
आतापर्यंत मुख्य निर्देशांकापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडी जास्त वाढ होत होती. मात्र सोमवारी छोट्या कंपन्यांच्या शेअरची तुफान विक्री झाली. या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅपची साडेपाच टक्‍क्‍यांपर्यंत हानी झाली. सर्वच गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.