पुण्याच्या टेनिस क्षेत्रात अनेक खेळाडू सध्या नावारूपाला येत आहेत आणि विविध स्पर्धा गाजवत आहेत, अशाच खेळाडूमध्ये एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे वैष्णवी आडकर हिचे. तिला दुखापतीमुळे पुढील काही काळ स्पर्धेबाहेरच राहावे लागणार असले तरीही तिला लवकरात लवकर पूर्ण तंदुरुस्त होत यशस्वी पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. दुखापत होण्यापूर्वीच्या तिच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला तर तिच्यातील जिद्दी व अव्वल खेळाडूची कामगिरी सिद्ध होते. ुऑल इंडिया टेनिस असोसिएशन, तेलंगणा राज्य टेनिस संघटनेच्या हैदराबाद येथील सानिया टेनिस अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल सीरिज टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकरने एकेरी व दुहेरीत विजेतेपद मिळविताना दुहेरी मुकुट संपादन केला.
चौदा वर्षांखालील गटाच्या एकेरीत वैष्णवीने उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या साई भोईरचा 6-1, 6-1 असा सरळ पराभव केला, तर अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या राधिका महाजनवर 6-1, 6-2 असा विजय मिळविला होता. दुहेरीत उपांत्य फेरीत वैष्णवीने महाराष्ट्राच्या परी सिंगच्या साथीत तेलंगणाच्या चांदणी श्रीनिवासन व महाराष्ट्राच्या राधिका महाजन या जोडीचा 6-1, 6-1 असा पराभव केला होता. तर, अंतिम फेरीत वैष्णवी व परी सिंगने हरियाणाच्या सूर्यांशी तन्वर व मैथिली मोथे या जोडीवर 6-3, 6-2 असा विजय प्राप्त करीत दुहेरीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गुवाहाटी येथे याआधी झालेल्या सुपर सीरिज टेनिस स्पर्धेतही वैष्णवीने चौदा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले होते.
वैष्णवी एरंडवणा येथील अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेत आठवी इयत्तेत शिकत असून, ती बाउन्स टेनिस अकादमीत केदार शाहच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. बारा वर्षांखालील गटापासून तिने सुरुवात केली आणि प्रत्येक स्पर्धेत तिने आपला ठसा उमटवला. खरे तर 10 व्या वर्षी तिने टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. एमएसएलटीएच्या अनेक स्पर्धा त्यावेळी तिने खेळल्या मात्र मनाप्रमाणे यश मिळविण्यासाठी तिला बरीच वाट बघावी लागली. 12 वर्षांखालील गटात खेळायला सुरुवात केल्यापासून तिचा यशाचा आलेख उंचावला. या गटात तिने खऱ्या अर्थाने व्यावसायिक टेनिसमध्ये पर्दापण केले. चंडीगड, मुंबई आणि गुरगाव येथील स्पर्धा जिंकत तिने आपल्या कामगिरीची दखल जाणकारांना घ्यायला लावली. बेंगळुरूमध्ये 16 वर्षांखालील गटात तिने विजेतेपद मिळविले आणि आगामी काळात आपण राष्ट्रीय स्तरावरही यशस्वी होऊ याची साक्ष दिली.
आता ती या वयोगटात खेळत असली तरी महिल्याच्या खुल्या गटात ज्यावेळी ती खेळेल तिथे तिची खरी कसोटी लागेल. या स्तरावर एक चूक देखील महागात पडू शकते. जर तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला यायचे असेल तर महिला गटात तिची कामगिरी 100 टक्के सरस झालीच पाहिजे. सध्या ती बाऊन्स अकादमीत केदार शहा याच्याकडे सराव करत आहे आणि तेच तिच्या गुणवतेची हमी देतात. केवळ ज्युनिअर गटाच्या किंवा वयोगटाच्या स्पर्धा खेळत न राहता खुल्या गटात होणाऱ्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक स्पर्धेत तिने सहभागी होणे गरजेचे आहे. या सहभागातून तिला सुरुवातीला जरी अपयश आले तरी अनुभव मात्र खूप मोठा मिळेल. आता मुख्य स्पर्धांमध्ये खेळायला लागली की तिच्यातील आत्मविश्वासही वाढेल आणि अन्य खेळाडूंचा खेळ बघून तिच्यातही बदल होतील. हेच बदल तिला तिच्या प्रगतीत मोलाचे ठरतील.
वरच्या स्तरावर खेळताना पदरमोड करून खेळावे लागण्यापेक्षा जर तिला एखादा प्रायोजक मिळाला तर आर्थिक पाठिंबा मिळेल आणि तिचा खेळ आणखी बहरेल. शालेय स्पर्धा, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत तिला आता स्वतःला सिद्ध करावे लागेल तरच ती राज्य, राष्ट्रीय स्थरावर प्रवेश करेल. तिचे प्रशिक्षक अत्यंत अनुभवी असल्यामुळे तिला प्रशिक्षण अव्वल दर्जाचे मिळत आहे यात शंकाच नाही. मात्र, या प्रशिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष सामन्यात दिसला पाहिजे. यासाठी तिने मेहनत घेतली पाहिजे. सध्या ती दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असली तरीही तिला पुनरागमनाचे वेध लागले आहेत. मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास तर तिच्याकडे आहेच पण आता येत्या काळात तिला सातत्याने होत असलेल्या दुखापतींबाबत गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. खेळ किंवा खेळाडू कोणताही असो त्याने जर दुखापतींवर विजय मिळवला तर कोणत्याही सामन्यात पराभवाची शक्यताही कमी होते.
टेनिसमध्ये दक्षिण भारतीय खेळाडूंचा दबदबा असतो. त्याला जर प्रतिउत्तर द्यायचे असेल तर दक्षिण भारतात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत अनुभव घ्यायला हवा आणि या सगळ्यासाठी प्रायोजक किंवा आर्थिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. हेच सर्व जर जुळून आले तर वैष्णवी एक सामान्य खेळाडू न राहता असामान्य खेळाडू झालेली दिसेल.
– अमित डोंगरे