मेथी आहे उत्तम दर्जाचं टॉनिक…

मेथीची भाजी अतिशय गुणकारी

मेथी मुबलक प्रमाणात मिळते. मात्र तिच्या कडू चवीमुळे कित्येक जण मेथीला नाक मुरडतात. पण ही मेथीची भाजी अतिशय गुणकारी आहे. मधुमेह, अंगदुखी, संधिवात, आम्लपित्त यांसारख्या विकारांवर मेथी अत्यंत गुणकारी आहे. अशा या मेथीचे आणखी कोणते औषधी गुणधर्म आहेत हे जाणून घेऊया.

चवीला अत्यंत कडू; परंतु आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हितावह असा मेथीचा गुणधर्म आहे. मधुमेहाला आटोक्यात आणायला मेथीचा बराच उपयोग होतो. मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. ते पाणी दिवसभर प्यावे. असं नित्यनेमाने महिनाभर केल्यास मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना शरीरात आश्चर्यकारक बदल झालेला दिसून येतो. मेथी कडू असल्याने मधुमेहाच्या विकारात अत्यंत गुणकारी ठरली आहे. लघवीतून साखर जाण्याच्या विकारातही वरीलप्रमाणे उपाय केला असता गुण आल्याचं आढळून आलं आहे.

आपल्या रोजच्या आहारात मेथीचा वापर करायला हवा. मग ती मेथीची भाजी असो वा मेथीचा लाडू किंवा मेथीचा पराठा अशा पदार्थाचा समावेश करावा. मेथीचा लाडू दिवसातून किमान एक तरी खावा. अंगदुखीवर तो अत्यंत गुणकारी आहे. याशिवाय मेथीचा लाडू बाळंतिणीला अवश्य द्यावा. त्यामुळे वातविकाराच्या त्रासापासूनही मुक्तता मिळते. मेथीपाकाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात, आम्लपित्त, बाळंतरोग आणि नेत्ररोग यावरही नियंत्रण राखलं जातं.

शरीर संगोपनासाठी सकाळ-संध्याकाळ चमचाभर मेथीपाक दुधाबरोबर घ्यावा. शरीर संवर्धनासाठी मेथीच्या तेलाचाही उपयोग केला जातो. मेथीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचाही आहारात अंतर्भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मलावरोधासारखे विकार दूर होतात. पोट साफ राहते. रक्तशुद्धीचेही कार्य त्यामुळे होते.

मेथी हे उत्तम दर्जाचं टॉनिक आहे. मेथीचे गुणधर्म वातहारक, वायुनाशक, वीर्यवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि रसधातूपोषक असे आहेत. रोज सकाळी थोडी थोडी मेथी खल्ल्याने वायुविकार दूर होतो. मेथी आणि सुंठेचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आम्लवात दूर होतो.

मेथीचा पराठा, गरगटे, लाडू, मेथीच्या वडया प्रसिद्ध आहेत. मेथी घालून पीठलंही तयार केलं जातं. हिवाळ्यात मेथीची भाजी विपूल प्रमाणात उपलब्ध होईल. शक्तिवर्धक भाजीचा जेवणात हमखास समावेश करावा. मेथीची पचडी हा कर्नाटकात प्रसिद्ध प्रकार आहे.

मेथीची पचडी
साहित्य : मेथीची जुडी, कांदा, दही, साखर, मीठ, तिखट, तेल.
कृती : मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यात कांदा, दही, साखर घालून एकत्र करावं. चवीसाठी तेलाची फोडणी द्यावी. तिखट आवडत असल्यास त्यात तिखट घालावं. दही न घालता देखील ही पचडी छान लागते. त्यात कांदा, मीठ, तिखट आणि कच्च तेल वरून घालून ती एकत्रित करावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.