माणदेशी महिलांची यशोगाथा: नोकरीऐवजी व्यवसायात यश मिळविणाऱ्या ‘कल्पना माळी’

श्रीकांत कात्रे

“माणदेशी फाउंडेशन’ आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक हे व्यासपीठ समाजाच्या सर्वच स्तरातील महिलांसाठी दिशादर्शक ठरते. ग्रामीण भागातील अशिक्षित महिला स्वावलंबी होत आहेतच. परंतु, उच्चशिक्षित महिलांसाठीही “माणदेशी’ प्रेरकच ठरत आहे. मोही (ता. माण) गावच्या कल्पना नीलेश माळी.

 

एम. कॉम. बी. एड. शिक्षण घेतल्यावर साहजिकच नेट, सेट परीक्षा आणि कुठेतरी शिक्षण संस्थेत नोकरी करावी, अशीच अपेक्षा होती. मात्र, त्याच्या मनाला कुठेतरी ते खटकत होते. एवढे शिकूनही नोकरी मिळविण्यासाठी काही पैसे खर्च करायचे, हे त्यांच्या मनाला पटत नव्हते. त्याच पैशांची गुंतवणूक करून काही तरी व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल, असे त्यांना वाटत होते. याबाबत त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींसमवेत चर्चा केली. त्यांच्या पतीचाही त्यांच्या विचारांना पाठिंबा होता. राजीव दीक्षित यांचे विचार ऐकताना खाद्यतेलांसदर्भातील मते त्यांना पटली.

लाकडी घाण्यातून मिळणारे खाद्यतेल आरोग्यासाठी अधिक उपयुक्त असते आणि असा आरोग्यदायी व्यवसाय करावा, असे त्यांनी निश्चित केले. अर्थातच माणदेशी संस्थांकडून मार्गदर्शन मिळत गेले. विविध प्रकारची खाद्यतेले लाकडी घाण्यावर तयार करायची म्हणजे कच्चा माल उपलब्ध करणे, तयार मालाला बाजारपेठ मिळणे, वाहतूक या सर्व बाबींबाबत अभ्यास करणे आवश्‍यकच होते.

या व्यवसायासंदर्भात माणदेशी’कडून प्रशिक्षण, अर्थसाह्य, पॅकिंग, आरोग्यदायी उत्पादन, मार्केटिंग, ऑनलाइन डीजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अकाउंट अशा सर्व प्रकारचे मार्गदर्शन झाले असल्याची माहिती कल्पना माळी यांनी दिली. माण तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या दहिवडीपासून जवळ असलेले बिदाल हे त्यांचे माहेर.

गोंदवले बुद्रुक येथे हा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांमुळे हे गाव तीर्थक्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्र व परराज्यातून या गावात येणारे लोक लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. गोंदवल्यात दोन लाकडी घाणे, शेंगा फोडण्याचे मशीन यासह दुकान सुरू केले. शेंगदाणे, सोयाबीन यासारखा कच्चा माल बाहेरून आणून उत्पादन करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. स्थानिक शेतकऱ्यांनी अशा पिकांचे उत्पादन घ्यावे आणि तो कच्चा माल घेऊन उत्पादन करावे, असे ठरवले.

लाकडी घाण्याद्वारे तेलाचे उत्पादन करण्याचा खर्च मोठा असतो. इतर रिफाइन्ड तेलापेक्षा बाजारात हे तेलाची किंमत अधिक असते. हे तेल आरोग्यदायी असते. त्याचे आहारमूल्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे इथे उत्पादित होणाऱ्या मालाची मागणी वाढली. सध्या दोन ऑपरेटर आणि तीन महिला कामगारांद्वारे उत्पादन घेतले जाते. उत्पादनाचे ब्रॅन्डिंग, पॅकिंग, बाटल्या भरणे या अशा सर्व गोष्टी मनुष्यबळाच्या साह्याने केल्या जातात. तेलाबरोबरच पेंडीचे उत्पादनही मिळते.

सातारा, कराड, मुंबई, अहमदनगर अशा शहरांतून वितरकांद्वारे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचते. नोकरी किंवा शिक्षणासंदर्भात काही करिअर करणे शक्‍य असतानाही व्यवसायात यशस्वी होता आले ते केवळ माणदेशी फाउंडेशनच्या प्रोत्साहनामुळे, अशी कृतज्ञताच कल्पना माळी व्यक्त करतात.

विविध प्रकारच्या तेलांची निर्मिती
लाकडी घाण्याद्वारे कल्पना माळी विविध प्रकारची तेले तयार करतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेंगदाणा, करडई, खोबरेल, तीळ, जवस, बदाम, आणि मोहरीच्या तेलाचा समावेश आहे. या स्वतः निर्मित केलेल्या उत्पादनांची विक्री त्या करतातच. त्याशिवाय इतर शेतकरी महिलांना मदत म्हणून त्यांच्याकडून उत्पादित केलेल्या सेंद्रिय शेतीमालाची विक्रीही त्यांच्या माध्यमातून करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.