‘कधी तरी लागतील’ म्हणूनसुद्धा पिशव्यांचा साठा केला जातो. असे असूनही ऐनवेळी त्या मिळत नाहीत, ते वेगळेच. मग घरात वेगवेगळ्या जागी बॅगा, पाकिटे साठवून ठेवली जातात. त्या घाईघाईत कुठेही कोंबलेल्या असल्याने नेमकी गरज असते तेव्हा त्या एकतर खराब झालेल्या असतात किंवा जुन्या खाद्यपदार्थाच्या राहून गेलेल्या अवशेषांमुळे सडूनसुद्धा गेलेल्या असतात. त्यामुळे बॅगा वापरल्यानंतर त्यांचा पुन्हा चांगल्याप्रकारे वापर होण्याच्या दृष्टीने त्यांची योग्य निगा राखण्याची आवश्यकता आहे. तीच काळजी वापरांतील पिशव्यांबाबत घेतली तरी चालेल.
पिशवी ही प्रत्येक घरातील महत्त्वपूर्ण वस्तू बनली आहे. कमी किंवा जास्त प्रमाणात वस्तू विकत आणताना पिशवीची गरज भासते. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीनंतर कागदी आणि कापडी पिशव्यांना चांगले दिवस आले आहेत. मात्र केवळ कागदी आणि कापडी नव्हे तर ज्यूटच्याही पिशव्या पाहायला मिळतात. वेगवेगळय़ा आकारातील रंगीबेरंगी पिशव्या लक्ष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.
सध्या पिशव्यांमध्ये अनेक पर्याय (ऑप्शन) आहेत. कागदी, कापडी, ज्यूटच्या पिशव्या, जाड कॅनव्हास कापडय़ाच्या पिशव्या, जुन्या साडय़ांपासून तयार केलेल्या हॅन्डी पिशव्यादेखील सर्वत्र पाहायला मिळतात. भाजीपाला खरेदीसाठी एकाहून अनेक कप्पे असलेल्या बॅग्जही दिसतात. मोठमोठय़ा शॉपिंग मॉलमध्ये किंमत आकारून कापडाच्या पिशव्या दिल्या जातात. मात्र घरातून चांगली पिशवी घेऊन जाणे, अधिक चांगले. दुकानांपेक्षा ऑनलाइन खरेदी करायचा एक ट्रेंड सध्या दिसून येत आहे. त्यावर विविध ‘ऑफर्स’ सुरू असतात. कागदी पिशव्यांमध्ये जड वस्तूंची ने-आण करता येत नसल्यामुळे कापडी पिशव्या वापरणे फायद्याचे आहे. जाळीदार मटेरिअलच्या आणि चेन असलेल्या बॅग्ज या लिंबे, टोमॅटो, काकडय़ा आणि आले आदी भाज्या ठेवण्यासाठी मिळतात. काही जण फोल्डिंग बॅग्ज वापरत असतात. या बॅग्ज अतिशय छोटी घडी होऊन खिशातसुद्धा बसतात. शिवाय गरजेनुसार मोठय़ा करून घेता येतात.
या बॅग्ज वापर करायला अतिशय सोप्या, कुठेही चटकन ‘फोल्ड’ करून ठेवता येतील, अशा असतात. चष्म्यांसाठी वापरल्या जाणा-या बॅग्ज आणखी वेगळय़ा असतात. बटव्यांचीदेखील भरपूर विविधता बाजारात उपलब्ध आहे. त्यात अतिशय महागडे बटवे, फंक्शन वेअर कपडय़ांवर जाणारे बटवे ते रोजच्या वापराचे बटवे, अशी भरपूर रेंज आहे. गरीब-धडपडय़ा कार्यकर्त्यांची म्हणून प्रसिद्ध असलेली शबनम पिशवीसुद्धा अतिशय ट्रेंडी असू शकते. त्यातही भरपूर आकार-प्रकार मिळतात. प्लास्टिक पिशवीसारखेच बंद असलेल्या, पण मऊ कापडी अशा बॅग्ज त्यांना असलेल्या बंदामुळे सामान भरून न्यायला, गाठ मारायला सोप्या पडतात. त्यांचीही चलती आहे. ‘नॉन ओव्हन पॉली प्रॉपिलिन बॅग्ज’ या प्रकारच्या बॅगांमध्ये तर प्रचंड ‘व्हरायटी’ बाजारात उपलब्ध आहेत. कॅमे-याच्या दुकानापासून ते स्टेशनरी दुकानांपर्यंत या बॅगांमध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते. या सर्व बॅगा आकर्षक असतात. एकाच वापरात त्या अगदीच खराब झाल्या नसतील, तर त्या जपून ठेवाव्याशा वाटतात.