नागपूर – महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला. हा लॉकडाऊन आठवडाभरासाठी लागू करण्यात आला आहे.
लॉकडाऊन दरम्यान नागपूर शहरात तब्बल १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आज (दि. २०) शहरातील याच परिस्थितीचा आढाव घेण्यासाठी नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत आढावा बैठक घेणार आहे. मात्र, यापूर्वी सगळ्या जन प्रतिनिधी सोबत बैठक नंतर व्यापाऱ्यांशी व्हिडिओकॉन्फरन्स च्या माध्यमातून बैठक असणार आहे. त्यामुळे नागपुरात २१ मार्च पर्यंत असलेलं लॉकडाऊन वाढणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाला.
नागपुरात लॉकडाऊन काळात खासगी कार्यालये बंद असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु आहेत. तसेच वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहे.