*नोंदणी आणि लसीकरण कसे करायचे, याबाबत संभ्रम
* राज्य लसीकरण विभागाने केंद्राकडे मागितले मार्गदर्शन
पुणे – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड यासारखे जन्मदिनांकाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले कोणतेही अधिकृत ओळखपत्र नाही, अशा भिक्षेकरी, बेघर, असंघटित कामगार, रस्त्याच्या कडेला राहणारे स्थलांतरित, निराधार ज्येष्ठ नागरिक, मनोरुग्ण गटातील अनेक व्यक्तींच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याने “कागदपत्रे नसलेल्या या व्यक्तींचे लसीकरण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करा,’ अशी विनंती राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांत 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. त्यासाठी “को-विन ऍप’वरून अथवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखे वयाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र आवश्यक आहे.
मात्र, भिक्षेकरी किंवा स्थलांतरित अशा अनेक व्यक्तींकडे कोणतेच ओळखपत्र नाही. त्यामुळे लसीकरण करताना कोणता पुरावा घ्यावा या संदर्भात संभ्रमावस्था आहे. त्यामुळे ओळखपत्रांची कोणतीही अट न ठेवता, या व्यक्तींचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी संबंधित सामाजिक संघटनांनी केली आहे.
जिल्ह्यातील 85 टक्के भिक्षेकऱ्यांच्या जन्माची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही ओळखपत्रेच नाहीत. अनेकजण व्याधीग्रस्तही आहेत. त्यामुळे या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहात आहेत. करोनाचे उच्चाटन करायचे असेल, तर ओळखपत्रांचा कोणताही आग्रह न धरता, या व्यक्तींचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यातूनच समूह प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
– डॉ. अभिजीत सोनवणे, “डॉक्टर फॉर बेगर्स’ संघटना
मनोरुग्णालयात अनोळखी म्हणून दाखल झालेले 172 रुग्ण आहेत. आई-वडिलांनी दाखल केले आहे, परंतु, आता ते हयात नाहीत अथवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क होत नाही, असे 173 रुग्ण आहेत. अशा 345 रुग्णांकडे आधार कार्डसारखी कोणतीही अधिकृत ओळखपत्रे नाहीत. या रुग्णांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्याचे पत्र राज्य लसीकरण विभागाला दिले आहे.
– डॉ. अभिजित फडणीस, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा
वृद्धाश्रमात दाखल झालेल्या सदस्यांच्या नातेवाईकांशी, मुलांशी आम्ही लसीकरणासंदर्भात संपर्क केला आहे. त्यांनी लसीकरणासाठी त्यांना घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु अद्याप येथेच कोठे सेंटरवर सोय करता येते का, याचा विचार सुरू आहे. त्यांना बाहेर नेणे अवघड आहे. सगळे जास्त वयाचे आहेत. बाहेर गर्दीत नेणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे होऊ शकते.
– सुषमा निलजीकर, संचालक, “ओलावा’ वृद्धाश्रम
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात अधिकृत ओळखपत्रे नसलेल्या भिक्षेकरी, बेघर, मनोरुग्णांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाकडे विचारणा केली आहे.
– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण प्रमुख