पतियाळा – फेडरेशन स्पर्धेच्या निकाली फेरीत नवोदित खेळाडू श्रीशंकर याने 8.26 मीटरच्या राष्ट्रीय विक्रमासह लांब उडीत ऑलिम्पिकची (Tokyo) पात्रता मिळवली. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संस्थेत सुरू असलेल्या पेडरेशन करंडक स्पर्धेत श्रीशंकरने ही कामगिरी केली.
त्याहीपेक्षा सनसनाटी कामगिरी तमिळनाडूच्या एस. धनलक्ष्मी हिने केली. तिने महिलांची 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकताना द्युती चंदला पराभवाचा धक्का दिला. तिने 11.39 सेकंद वेळ देत ही शर्यत जिंकली. दिल्लीच्या अमोज जेकब याने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 400 मीटर शर्यत जिंकली.
श्रीशंकर याने पाचव्या प्रयत्नात 8.22 मीटरचा पात्रता निकष पूर्ण करतानाच राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. यापूर्वी 8.20 मीटरचा विक्रम त्याच्याच नावावर होता. त्याने पहिल्या चारही प्रयत्नांत 8 मीटरचे अंतर पार केले. पहिल्या प्रयत्नांत 8.02, नंतर 8.04, पुढे 8.07 आणि 8.09 मीटर असे अंतर गाठले. दिल्लीच्या 23 वर्षीय अमोज जेकब याने वेगाचे सुरेख प्रदर्शन करताना 400 मीटर शर्यत 45.68 सेकंद अशी वेळ देत जिंकली. महिला विभागात अनुभवी पुवम्मा अन्य खेळाडूंसमोर सरस ठरली.
धनलक्ष्मीचा धडाका
महिलांच्या 100 मीटर शर्यतीत तमिळनाडूच्या धनलक्ष्मीने अव्वल खेळाडू द्युती चंदचा पराभव केला. द्युती, हिमा दास, अर्चना सुसींद्रन, असे तगडे आव्हान असताना धनलक्ष्मीने त्या सर्वांना मागे टाकले. आशियाई पदक विजेत्या द्युतीला तिने 0.19 सेकंदाने मागे टाकले.