कतार – ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील पात्रता फेरीचा स्थगित करण्यात आलेला सामना आता होणार नाही. तसेच या दोन्ही देशांच्या फुटबॉल संघटनांतील वाद मिटवण्यात आला असून त्यामुळे हे संघ फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला अखेर पात्र ठरले आहेत.
अर्जेंटिना व ब्राझिलीयन फुटबॉल संघटना आणि फिफा यांच्यातील वाद क्रीडा न्यायालयात मिटला आहे. ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.
फेब्रुवारीमध्ये फिफाने हा सामना खेळवला गेला पाहिजे असे सांगितले होते. मात्र, दोन्ही संघांनी अंतर्गत वाद असल्यामुळे त्याला नकार दिला होता. यामुळे या दोन्ही संघांना मोठ्या रकमेचा दंडही फिफाने ठोठावला होता. त्यानंतर हे प्रकरण क्रीडा न्यायालयात
गेले होते.
दक्षिण अमेरिका खंडातील पात्रता फेरी गटातील हा स्थगित झालेला ब्राझील आणि अर्जेंटिना हा सामना पुन्हा खेळवला जाणार नसला तरीही त्याच्या पात्रता फेरीच्या निकालावर काही परिणाम होणार नसल्याचेही समोर आले आहे. दक्षिण अमेरिका खंडातील पात्रता फेरीत ब्राझील अव्वल स्थानी तर अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.