नवी दिल्ली -कॉंग्रेसला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. केरळमधील नेते असणाऱ्या चाको यांनी त्या राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच पक्षबदलाचे पाऊल उचलले.
प्रदीर्घ काळ कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असणाऱ्या चाको यांनी मागील आठवड्यात कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. कॉंग्रेसच्या केरळमधील नेत्यांबरोबरचे मतभेद उफाळून आल्याने त्यांनी त्या पक्षाचा हात सोडला. केरळमध्ये कॉंग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. उमेदवार निवडीत आपापल्या गटांचाच विचार केला जातो. कॉंग्रेसमध्ये लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी त्या पक्षातून बाहेर पडताना केली. केरळमधील माकपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ डाव्या लोकशाही आघाडीचा घटक असणाऱ्या राष्ट्रवादीत आता चाको यांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत चाको यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. केरळमध्ये डावी आघाडी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सत्तेसाठी प्रमुख लढत होणार आहे.