नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 28 हजार 903 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात करोना रूग्ण आढळून येण्याचा सन 2021 या नवीन वर्षातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या आता 1 कोटी 43 लाख 8 हजार 734 इतकी झाली आहे.
तसेच गेल्या 24 तासांत करोनाचे 188 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 59 हजार 44 इतकी झाली आहे. गेल्या आठवडा भरात देशातील करोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात करोना लसीकरणाचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी त्याच प्रमाणात करोनाचे नवीन रूग्णही आढळून येत असल्याने सरकारी यंत्रणांची पुन्हा तारांबळ सुरू झाली आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारी पातळींवर पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.