- रोज वाढताहेत रुग्ण
- देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 3.37 टक्के रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये
- देशातील एकूण मृत्यूंपैकी 1.18 टक्के मृत्यू शहरात
- देशाचा रिकव्हरी रेट 96.56 टक्के तर शहराचा रिकव्हरी रेट 91.61
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. बुधवारी शहरातील तब्बल 1248 जणांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 7912 इतकी झाली आहे. देशात असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांच्या 3.37 टक्के रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 896 इतका झाला आहे.
सप्टेंबर 2020च्या पहिल्या तीन आठवड्यात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आणि आता मार्चमध्ये ही संख्या पुन्हा वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार सप्टेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच मार्च 2021 मध्ये करोना उच्चांक गाठत आहे.
अवघी 25 लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या 0.18 टक्के इतकीच आहे. बुधवारी सायंकाळी देशात 2 लाख 34 हजार 406 सक्रिय करोनाबाधित होते. त्यापैकी 3.37 टक्के म्हणजेच 7912 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. बुधवारी करोनामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील 1888 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या देशातील एकूण करोना मृत्यूंच्या 1.18 टक्के इतकी आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात 615 करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे शहरात आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 107096 इतकी आहे. एकीकडे देशाचा रिकव्हरी रेट 96.56 आहे तर पिंपरी-चिंचवड शहराचा रिकव्हरी रेट 91.61 टक्के इतका आहे.
चाचणीसाठी 6930 संशयित दाखल
गेल्या 24 तासांमध्ये करोना चाचणीसाठी तब्बल 6930 संशयित दाखल झाले आहेत. हा आतापर्यंतच्या सर्वाधिक आकड्यांपैकी एक आहे. अद्याप 1506 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरात सक्रिय असलेल्या 7912 करोना रुग्णापैकी तब्बल 6163 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर अवघे 1749 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.