नवी दिल्ली – देशातील राष्ट्रीय पातळीवरील ६ राजकीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील उत्पन्न ३,०७७ कोटी रुपये इतके होते. यामध्ये सत्तारुढ भाजपचेच उत्पन्न सर्वाधिक म्हणजे २,३६१ कोटी रुपये इतके होते. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय पातळीवरील ६ राजकीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत भाजपचे उत्पन्न ७६.७३ टक्के इतके होते.
२०२२- २३ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्याबाबत कॉंग्रेसचा दुसरा क्रमांक लागतो. या कालावधीत कॉंग्रेसचे उत्पन्न ४५२.३७५ कोटी रुपये इतके होते. सहा पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हे १४.७० टक्के इतके आहे. भाजप आणि कॉंग्रेसबरोबर बसपा, आप, एनपीपी आणि सीपीआय-एम या पक्षांनीही याच आर्थिक वर्षातले आपले उत्पन्न जाहीर केले आहे.
२०२१-२२ ते २०२२-२३ या काळात भाजपच्या उत्पन्नात २३.१५ टक्के म्हणजे ४४३.७२४ कोटींची वाढ झाली होती. नॅशनल पीपल्स पार्टीचे याच काळातील उत्पन्न ४७.२० लाखावरून तब्बल १५०२ टक्क्यांनी वाढून ७,५६२ कोटी रुपये झाले होते. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीचे उत्पन्न ४४.५३९ कोटी रुपयांवरून ९१ टक्क्यांनी वाढून ८५.१७ कोटी रुपये झाले आहे.
२०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात कॉंग्रेस, सीपीआय (एम) आणि बसपाचे उत्पन्न मात्र घटले आहे. या पक्षांचे उत्पन्न अनुक्रमे ८८.९० कोटी (१६.४२ टक्के), २०.५७ कोटी (१२.६८ टक्के) आणि १४.५०८ कोटी (३३.१४ टक्के) इतके कमी झाले असल्याचे या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नोंदींवरून आढळून आले आहे.
भाजपचे उत्पन्न जरी २,३६०.३४४ कोटी रुपये असले, तरी यापैकी ५७ टक्के म्हणजे १,३६१.६८४ कोटी रुपयांची रक्मम पक्षाने खर्च केली. तर कॉंग्रेसने आपल्या उत्पन्नापेक्षा ३ टक्के जास्त रक्कम खर्च केली. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीनेही आपल्या उत्पन्नाच्या १९.८२ टक्के जास्त रक्कम खर्च केली. सीपीआय (एम)ने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ७४ टक्के रक्कम खर्च केल्याचे निरीक्षणामध्ये आढळले आहे.