नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला रसद पुरविणार्या महेश तनपुरेच्या गुलमोहर रस्त्यावरील घराची आज पोलिसांनी झाडाझडती घेतली, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे गेल्या 102 दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. बोठेला अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.
जरे हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या सहा आरोपींसह हत्याकांडानंतर बोठे यास लपण्यासाठी मदत करणार्या ताब्यात घेतले. त्यातील आज महेश तनपुरेच्या घराची झाडाझडती घेतली आहे. जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद होते.
आता बोठे याची पोलीस कसूनचौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत आहे. दरम्यान, हैद्राबाद येथून अटक केलेल्या चार जणांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
लॉकअपला तगडा बंदोबस्त
रेखा जरे खून प्रकरणातील संशयित मुख्यसूत्रधार बाळ बोठे याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच, तिथे स्वंतत्र पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्याचा खडा पहारा असून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरेची नजर असल्याचे बोलले जात आहे.