नायपितॉ – म्यानमारमध्ये चिनी मालमत्तांवर लोकशाही समर्थक आंदोलकांकडून होणारा हिंसाचार वाढत आहेत आणि हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडून अंदाधुंद गोळीबार सुरू केला आहे. रविवारी दोन चिनी कापड उद्योगांना आगी लावण्यात आल्या होत्या. त्याशिवाय इतर चिनी मालमत्तांवर जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान 38 निदर्शक ठार झाले होते.
चिनी मालमत्तांवर आंदोलकांकडून हल्ले होत असल्याचे सत्र गेल्या काही दिवसातच सुरू झाले असले तरी म्यानमारमधील लष्करी बंडाचा निषेध करणाऱ्या पोस्ट म्यानमारमधील चिनी दूतावासाच्या फेसबुक पेजला टॅग करून अव्याहतपणे पोस्ट केल्या जात आहेत. या बंडामागे चीनच असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. विशेषतः चिनी मालमत्तांवर हल्ले करणाऱ्यांना शिक्षा करावी, असे आवाहन चिनी दूतावासाने केले, त्यानंतर चीनला दोष देण्याचे प्रमाण वाढले आहे.
म्यानमारच्या राखाईन राज्यातील चीनच्या अर्थसहायावर क्युकफ्यू बंदरला चीनच्या युन्नान प्रांताशी जोडणाऱ्या तेल आणि गॅस पाइपलाइनला आग लावण्याची धमकीही सोशल मिडीयावरून दिली जाऊ लागली आहे. म्यानमारमधील लष्करी उठाव “मेड इन चायना’ असल्याचे फलक आंदोलनातील नागरिकांच्या हातात दिसत आहेत. त्यातूनच या बंडामागे चीन असल्याचा सार्वत्रिक जनक्षोभ स्पष्ट दिसून येत आहे.
ग्युटरेज यांनी केली जोरदार टीका…
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव ऍन्टोनिओ ग्युटेरज यांनी म्यामारमध्ये वाढत्या लष्करी हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांचे मृत्यू, मनमानी पद्धतीने चालवलेले अटकसत्र, अटकेत असलेल्या नागरिकांचा छळ या घटना, मानवाधिकारांचे उल्लंघन असून म्यान्मारमधील लष्कराचा हा मनमानी कारभार संपवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन ऍन्टोनिओ ग्युटेरज यांनी केले आहे.