नवी दिल्ली -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पहिला टप्प्यासाठी कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या गटातील (जी-23) बहुतांश नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल या ज्येष्ठांसह कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी मागील वर्षी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये संघटनात्मक पातळीवर पक्षात व्यापक फेरबदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे ते नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले गेले. नंतर ते नेते पक्षातील सहकाऱ्यांच्याच निशाण्यावर आल्याचेही पाहावयास मिळाले. मात्र, अलिकडेच जी-23 नेत्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रचार करण्याची इच्छा बोलून दाखवली. अशातच बंगालसाठी कॉंग्रेसने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. मात्र, त्यामध्ये संबंधित गटातील जितीन प्रसाद आणि अखिलेशप्रसाद सिंह या केवळ दोन नेत्यांनाच स्थान देण्यात आले आहे.
पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये सोनिया, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. त्याशिवाय, मोहम्मद अझरूद्दीन आणि नवज्योतसिंग सिद्धू या माजी क्रिकेटपटूंबरोबरच सचिन पायलट यांच्यासारखे तरूण नेतेही कॉंग्रेसचे स्टार प्रचारक ठरले आहेत.