संबळ – उत्तरप्रदेशात एका 21 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर नैराश्य आलेल्या या तरूणीने आपल्या राहत्या घरातच दुपट्ट्याने गळफास लाऊन घेतल्याचा प्रकार भाजपोई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडला. गुरूवारी रात्री हा प्रकार घडला.
या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. 27 जानेवारी रोजी हा बलात्काराचा प्रकार घडला होता. त्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संबंधीत आरोपीला 3 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आरोपीच्या कुटुंबियांनी या मुलीच्या पालकांना तक्रार मागे घेण्यासाठी सातत्याने धमकावणे सुरू केल्याने त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पोलिसांनी आता या आरोपीच्या आई वडिल आणि भावालाही अटक केली आहे.