नागपुर – महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मितीचे युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केले आहे.
गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील म्हणाले की, छत्तीसगड सीमेजवळील तब्बल 5 किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला आहे. पोलीस दलाच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे. येथील माओवाद्यांच्या शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या युनिटचा भांडाफोड झाला आहे. गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील कोपारशीच्या जंगलात गेल्या 48 तासांपासून अभियान जारी आहे.
जवानांची कामगिरी अभिमानास्पद
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.