सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरातील प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालये स्वतंत्र विस्तारीत इमारतीत हलवावीत. त्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या उदयनराजेंचे मुंबईत राजकीय गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. त्यांनी मंगळवारी ना. थोरात यांची भेट घेतली.
या निवेदनात म्हटले आहे की, सातारच्या ब्रिटिशकालीन इमारतीत तहसील व प्रांत कार्यालये असून, त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभारणे गरजेचे आहे. या प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा. प्रांत व तहसील कार्यालय पोवई नाका-बसस्थानक रस्त्यावर आहे. तेथे जागा मोठी आहे.
सध्याची इमारत ब्रिटिशकालीन असून, तेथे पूर्वी सैनिकांची हजेरी आणि कायदा सुव्यवस्थेचे काम केले जात होते. याच परिसरात दुय्यम निबंधक, तालुका भूमी अभिलेख, जिल्हा भूमी अभिलेख, नगरभूमापन कार्यालये आहेत. तहसील व भूमी अभिलेखच्या कार्यालयांना कोंडवाड्यात स्वरूप आले आहे.
या परिस्थितीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तेथे नवीन, प्रशस्त बहुमजली इमारत उभारणे गरजेचे आहे. या कामासाठी निधीची तरतूद करावी. या जागेत उपवनसंरक्षक कार्यालय होते. आता ते शासकीय जागेत स्थलांतरीत झाले आहे.
उदयनराजेंची मागणी रास्त आहे. या आधी कोणीच अशी मागणी केली नसल्याबद्दल ना. थोरात यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी दिलेल्या प्रस्तावात लक्ष घालून तो मार्गी लावू. निधीची तरतूद करू, अशी ग्वाहीदेखील ना. थोरात यांनी दिली.
दरम्यान, यावेळी झालेल्या चर्चेत उदयनराजेंनी नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. या योजनेच्या एसटीपी प्लॅंटसाठी जरंडेश्वर नाका, सदरबझार येथील शासकीय जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणीही उदयनराजे यांनी केली. त्यास ना. थोरात यांनी मान्यता देऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही कळविले आहे.