पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, परीक्षासंदर्भाच्या एजन्सीवरून काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायची अथवा कोणत्या पद्धतीने घेतली जाईल, याविषयी विद्यापीठाचे परीक्षा विभागच अनभिज्ञ आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणखी वाढला आहे.
विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून परीक्षेसाठी नव्याने एजन्सी नेमण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.
ही परीक्षा पूर्वीच्या की नव्या एजन्सीद्वारे घेण्यात येणार आहे, याविषयी अजूनही ठोस निर्णय विद्यापीठाकडून जाहीर झालेला नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर एजन्सीच्या चर्चेने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन कोलमडणार आहे. दरम्यान, ही परीक्षा कोणत्या एजन्सीवरून घ्यायची, याविषयी विद्यापीठाने अधिकृत काहीच माहिती दिलेली नाही.
नवीन एजन्सी नेमल्यास त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे एजन्सी जुनी की नवीन, याविषयी विद्यापीठाने काहीच आदेश अद्यापपर्यंत दिले नाहीत. त्यामुळे परीक्षा कशा पद्धतीने घ्यायचा, याविषयी आम्हीच अनभिज्ञ असल्याची माहिती परीक्षा विभागाच्या सूत्रांनी दिली.
परीक्षा मंडळाची बैठक
विद्यापीठाच्या परीक्षेचे स्वरुप काय असेल, याविषयी अजूनही संदिग्धता आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणे आवश्यक आहे. त्याशिवाय ठोस निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे ही बैठक घ्यावी लागेल, असेही सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रकारात आठवभराचा कालावधी लागणार आहे. परिणामी, ही परीक्षा वेळेत होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.