चीनच्या सायबर हल्ल्यावरून राजकीय धूमशान

मुंबई  – चीनच्या सायबर हल्ल्यामुळे 12 ऑक्‍टोबरला मुंबईची वीज गायब झाल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांच्या तपासाचा हवाला देत सांगितले होते. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. देशमुख हे जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. तर हा विषय तांत्रिक असल्याने बावनकुळे यांना समजू शकणार नाही, असा पलटवार देशमुख यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार अपयश झाकण्यासाठी मुंबई काळोखात चीनच्या सायबर हल्ल्यामुळे बुडाल्याच्या बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवत आहे. 12 ऑक्‍टोबर 2020 रोजी मुंबई केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे काळोखात बुडाली. ते लपवण्यासाठी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री शक्कल लढवत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

चीनच्या सायबर हल्ल्याचे कारण देत जनतेची दिशाभूल करणे सुरू केली आहे.एका बातमीवर आयपीएस अधिकारी अहवाल तयार करून त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचे नमूद करतात. अशा अहवालाची खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खाते आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणे राज्य सरकारला महत्त्वाचे वाटले नाही, याचे आश्‍चर्य वाटते, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचे हसे करून घेऊ नये, असा टोला अनिल देशमुख यांनी ट्‌विटद्वारे लगावत पलटवार केला आहे.

न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ऍनालिसीस कंपनीच्या दाव्यांवर महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने तीन गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्‍यता वर्तवली आहे. हा पूर्ण अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, त्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली होती.

सायबर सेलचे तीन मुद्दे
1) 14 ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा मिळाला आहे.
2) 8 जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो.
3) ब्लॅकलिस्टेड आयपी ऍड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.