नगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीसाठी आज दिवसभरात दोन अर्ज दाखल झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी हजेरी लावली. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा अगदी सहजच बाहेर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र असताना नगरमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीला भाजप धावल्याची जोरदार चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अजून अवधी असल्याने सभापतीपदाची निवडणूक भाजप लढविणार आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.4) रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. बुधवारी (दि. 3) रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत भरण्याची मुदत आहे. सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी दोन उमेदवारी अर्ज नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे दाखल केले.
घुले यांच्या एका अर्जाला बसपचे मुदस्सर शेख हे सूचक तर, राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे अनुमोदक आहेत. दुसर्या अर्जाला राष्ट्रवादीचे सागर बोरुडे सूचक असून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव अनुमोदक आहेत. त्यामुळे काँग्रेस व बसपाचे सदस्यही राष्ट्रवादीसोबत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत असल्याने शिवसेना रिंगणात उतरणार की राष्ट्रवादीला बिनविरोध संधी देणार? याकडेही लक्ष लागणार आहे.
दरम्यान, घुले यांचा अर्ज दाखल करतेवेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह सभागृह नेते मनोज दुल्लम, भाजपचे नगरसेवक रामदास आंधळे, रवींद्र बारस्कर, तसेच विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, बसपचे मुदस्सर शेख, सचिन जाधव, काँग्रेसचे धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार उपस्थित होते. महापालिकेत राष्ट्रवादी व भाजपची छुपी युती असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे नगरमध्ये शिवसेनेलाच बाजूला ठेवून सत्ताकारण होईल, असे चित्र दिसत आहे.