चेन्नई – यंदा होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव गुरुवारी (18 फेब्रुवारी) चेन्नई येथे पार पडला. या लिलावात 292 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती. त्यापैकी काही थोड्याच खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात प्रामुख्याने विदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहिला मिळाला.
या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यापूर्वी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू युवराज सिंग ठरला होता. त्याला दिल्ली कॅपिटल संघाने 2016 साली 16 कोटीला खरेदी केले होते. मात्र यंदा राजस्थान रॉयल्स संघाने क्रिस मॉरिसला 16.25 कोटीला खरेदी करुन इतिहास रचला आहे.
आज आपण आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेवूया. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेचे 13 हंगाम पार पडले आहेत. त्यापैकी काही हंगामातील सामने विदेशात सुद्धा खेळले गेले आहेत.
#IPL2008 : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी महागडा खेळाडू ठरला होता. त्याला या हंगामात 6 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले होते.
#IPL2009 : आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात दोन विदेशी खेळाडू सर्वात महागडे ठरले होते. यामध्ये इंग्लडच्या केविन पीटरसनला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने 7.55 कोटीला खरेदी केले होते. त्याबरोबर एंन्ड्रयू फ्लिंटॉपला सुद्धा 7.55 कोटीला खरेदी केले होते.
#IPL2010 : तिसऱ्या हंगामाच्या लिलावात दोन विदेशी खेळाडू महागडे ठरले होते. यामध्ये किरॉन पोलार्ड आणि शेन बॉन्ड यांचा समावेश होता. यापैकी किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने आणि कोलकाता नाइट रायडर्सने शेन बॉन्ड या दोन खेळाडूंना प्रत्येकी 4.8 कोटीला खरेदी केले होते.
#IPL2011 : या हंगामात भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज गौतम गंभीर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला कोलकाता नाइट रायडर्स संघाने 11.04 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते.
#IPL2012 : आयपीएलच्या पाचव्या हंगामात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला सर्वाधिक 9.72 कोटीची बोली लागली होती. इतकी मोठी रक्कम मोजून त्याला चेन्नई संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते.
#IPL2013 : सहाव्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला सर्वाधिक 5.3 कोटीची बोली लावण्यात आली होती. त्याला मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले होते.
#IPL2014 : भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगवर आयपीएलच्या सातव्या हंगामात सर्वात जास्त बोली लावण्यात आली होती. त्याला रॉयल चॅलेंजर संघाने 14 कोटीला खरेदी केले होते.
#IPL2015 : आठव्या हंगामात सुद्धा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला या हंगामात 16 कोटी रुपये देऊन दिल्ली संघाने खरेदी केले होते.
#IPL2016 :आयपीएलचा नवव्या हंगामाचा सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन
ठरला होता. शेन वॉटसनला 9 कोटीची बोली लागली होती. या हंगामात त्याला रॉयल चॅलेंजर संघाने खरेदी केले होते.
#IPL2017 : बेन स्टोक्स हा दहाव्या हंगामाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यावर या हंगामात 14.5 कोटीची बोली लावून रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने त्याला खरेदी केले होते.
#IPL2018 : आयपीएलच्या अकराव्या हंगामात सुध्दा बेन स्टोक्स हा महागडा खेळाडू ठरला होतो. त्याला सर्वाधिक 12.5 कोटींची बोली लावून राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले होते.
#IPL2019 : बाराव्या हंगामाच्या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पहायला मिळाला होता. यामध्ये जयदेव उनाडकट आणि वरुन चक्रवर्ती हे दोघे सर्वात महागडे ठरले होते. या दोघांना प्रत्येकी 8.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते. राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला आणि पंजाबने वरुन चक्रवर्तीला आपल्या ताफ्यात सामील केले होते.
#IPL2020 : आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूएईत आयोजित करण्यात आला होता. तेराव्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्स हा सर्वात महागडा ठरला होता. त्याला या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
#IPL2021 : यंदा (2021) आयपीएलचा चौदावा हंगाम खेळला जाणार आहे. या चौदाव्या हंगामाचा लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्रिस मॉरीस हा सर्वात महागडा ठरला. त्याला या लिलावात सर्वात जास्त 16.75 कोटी रुपयांनी राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. त्याचबरोबर तो आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.