गोरखपूर – विवाहित पुरूषासोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून कुटुंबीयांनी हत्येची सुपारी देऊन तरूणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. रंजना यादव (वय-28) असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी तरूणीचे वडील, भाऊ आणि अन्य दोघा नातेवाईकांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीचे अन्य धर्माच्या विवाहित पुरूषासोबत प्रेमसंबंध होते. तिने प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिल्याने, वडिलांनी आणि कुटुंबीयांनी एका गुंडाला तिच्या हत्येची सुपारी दिली. हत्या करण्यासाठी गुंडाला दीड लाख रूपये देण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी एका तरूणीचा अर्धवट जळालेला मृतदेह जिगिना या गावात आढळला होता. गोरखपूरच्या बेलघाट येथील रंजना यादव हिचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबीयांनीच गुंडाला सुपारी देऊन हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी तरूणीचे वडील, भाऊ आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीने तिला दुचाकीवरून जिगिना गावाजवळ निर्जन ठिकाणी नेले. तरूणीचे तोंड,हात,पाय बांधून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
रंजनाचे एका विवाहित पुरूषासोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर कट रचून तिची हत्या करण्यात आली, असे तरूणीच्या वडिलांनी सांगितले आहे.