नागपुर – महाराष्ट्रात येत्या 20 तारखेला यवतमाळ येथे किसान महापंचायत होणार असून संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत हे या महापंचायतीला मार्गदर्शन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा ही चाळीस शेतकऱ्यांची महासंघ असलेली संघटना असून या संघटनेतर्फे दिल्लीच्या सीमेवर सध्या धरणे आंदोलन सुरू आहे.
या संघटनेचे महाराष्ट्रातील समन्वयक संदीप गिड्डे यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाचे अन्य नेतेही या महापंचायतीला उपस्थित राहणार आहेत. यवतमाळच्या आझाद मैदानावर ही महापंचायत होणार आहे.
यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यानीं आत्महत्या केल्या असल्याने महाराष्ट्रातील किसान महापंचायतीची चळवळ तेथून सुरू व्हावी अशी अपेक्षा टिकैत यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तेथे ही महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ते म्हणाले. या महापंचायतीला विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.