नवी दिल्ली – शुक्रवारी भारतीय सराफात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी होत असतानाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारत आहे. या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम सोन्याच्या भावावर होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने म्हटले आहे.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,815 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.96 डॉलर प्रति औंस झाले.
जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य कमी होत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढत आहे. या कारणामुळे काही गुंतवणूकदार सोने खरेदी करीत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सोन्याच्या दरात बरीच वाढ झाली होती. मात्र आता जागतिक व्यापार वाढू लागल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक इतर व्यवसायाकडे वळू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही यावर्षी सोन्याचे दर वाढतील मात्र ते गेल्यावर्षी इतके वाढणार नाहीत असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले आहे.