मुंबई – अर्थसंकल्पानंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाटचाल करीत असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यातल्या त्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात थैल्या रिकामे करणे चालूच ठेवले आहे. त्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 51 हजार अंकाच्या पुढे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 हजार अंकांच्या पुढे बंद झाला.
गेल्या 6 कामकाजाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक 11 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य केव्हाच 200 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यानंतर नफेखोरी अपेक्षित असते. मात्र परदेशी संस्था गुंतवणूकदारांकडून चांगला आधार मिळत असल्यामुळे शेअर बाजारात सध्या नफेखोरीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत 617 अंकांनी म्हणजे 1.22 टक्क्यांनी उसळुन 51,348 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 191 अंकांनी म्हणजे 1.28 टक्क्यानी वाढून 15,115 अंकांवर बंद झाला.
कोणत्या कंपन्यांचे शेअर वाढले
महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिन्सर्व, भारती एअरटेल, पावर ग्रिड, इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅंक
कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले
हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बॅंक, बजाज फायनान्स, आयटीसी, बजाज ऑटो, सनफार्मा
वाहन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली. अर्थसंकल्पापासून सरकारी बॅंकांचे शेअर वाढत होते. मात्र आज त्यात खंड पडला. सरकारी बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तांची परिस्थिती सुधारत असतानाच या बॅंकांना 20 हजार कोटी रुपयांची भांडवली मदत देण्याचे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.
मोठ्या कंपन्यांचे शेअर मुख्य निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे महाग झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आता छोट्या कंपन्यांच्या शेअर कडे वळविला आहे. आजही मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 1.53 टक्क्यापर्यंत वाढले.
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजार निर्देशांकांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाढल्यामुळे आता एक क्रुडचे दर वाढत असून ते 60 डॉलर प्रती पिंपाच्या पुढे गेले आहेत.