संयुक्त राष्ट्रे – भारतातील उत्तराखंड राज्याला काल हिमनगाचे कडे कोसळून ज्या आपत्तीचा सामना करावा लागला आहे त्या आपत्तीसाठी आवश्यक ती मदत करण्याची सिद्धता आम्ही ठेवली आहे, असे संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टेनिओ गुटेर्रेस यांनी म्हटले आहे. या आपत्तीत तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि जीवितहानी झाली आहे, त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीबद्दल बोलताना संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजार्रिक यांनी म्हटले आहे की, कालच्या घटनेचे वृत्त ऐकून सरचिटणीसांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांविषयी सहानुभूती व्यक्त केली असून तेथील मदत व पुनर्वसन कार्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने सिद्धता ठेवली आहे असेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायम राजदूत टी. एस. तिरूमूर्ती यांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.