बीजिंग – चीनमध्ये करोनाविरोधात सायनोव्हॅक बायोटेक कंपनीच्या लसीच्या सार्वजनिक वापराला परवानगी देण्यात आली आहे. चीनमधील वैद्यकीय उत्पादन नियामकांनी या लसीच्या सार्वजनिक वापरासाठी मंजूरी दिली आहे, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. चीनमध्ये करोना विषाणूच्या प्रतिरोधासाठी मंजूरी देण्यात आलेली सायनोव्हॅक बायोटेक ही दुसरी लस आहे.
यापूर्वी “चायना नॅशनल फार्मास्योटिकल ग्रुप’ अर्थात ‘सायनोफार्म’या सरकारी कंपनीने बनवलेल्या करोना विरोधी लसीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. सार्वजनिक वापरासाठी मंजूरी मिळण्याआगोदर या दोन्ही लसींचा वापर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या गटांसाठी वापरायला सुरुवात झाली आहे.
सिनोव्हॅक लाइफ सायन्सेसने विकसित केलेल्या कोरोनाव्हॅक लसीच्या आपत्कालिन काळातील वापरासाठी इंडोनेशिया, तुर्की, ब्राझील, चिली, कोलंबिया, उरुग्वे आणि लाओस या देशांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे, असे सायनोव्हॅक कंपनीने सांगितले. लसीच्या दोन महिने परदेशात चाललेल्या वैद्यकीय चाचण्यांनंतर ही मंजूरी देण्यात आली आहे. मात्र या चाचण्यांचे अंतिम अहवाल अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, असे सायनोव्हॅक कंपनीने म्हटले आहे.