नवी दिल्ली – जगातील कोविड19 प्रतिबंधक सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमांपैकी एक असलेल्या लसीकरण मोहिमेची तीन आठवड्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती. ज्या लोकांना 16 जानेवारी 2021 रोजी लस देण्यात आली होती, त्यांना या लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम 13 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तात्पुरते डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र जारी करण्याची आणि लसीचा दुसरा डोस घेतल्यावर अंतिम प्रमाणपत्र देण्याची योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणाच्या महत्त्वावर आणि कोविन ऍपवरील माहिती वेळेत अद्ययावत करण्यावर आरोग्य सचिवांनी भर दिला. कोविन 2.0 आवृत्ती लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणासंदर्भात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली. केवळ 21 दिवसात लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा ओलांडून भारत जगातील सर्वात वेगाने लसीकरण करणारा देश बनला असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या राज्यांनी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधीच नोंदणी केली आहे, त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची काळजी घेण्याच्या सूचना राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या. आरोग्य केंद्रांमध्ये एकाच वेळी शक्य असेल तितक्या लसीकरण सत्रांचे, दिवसांचे आयोजन करावे, असे देखील त्यांना सांगण्यात आले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एक विशिष्ट राज्यनिहाय धोरण तयार करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली.