टोरंटो – कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलेली एक महिला अचानक कोट्याधीश झाली आहे. तिला तब्बल 437 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. कॅनडामधील टोरंटो शहरात ही घटना घडली आहे.
सीएनएन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय डेंग प्रवतुडोम यांना 437 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांच्या पतीला 20 वर्षांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. या स्वप्नात त्यांना काही क्रमांक दिसले.
याच क्रमांकांमुळे डेंग यांना ही बंपर लॉटरी लागली असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेंग यांना दोन मुलं आहेत. मागील 20 वर्षांपासून त्या आपल्या पतीच्या स्वप्नातील आकड्यांप्रमाणे लॉटरीचं तिकिट विकत घेत होत्या. इतके वर्ष लॉटरी लागली नाही तरीही त्यांनी या आकड्यांचा पिछा काही सोडला नाही आणि आता त्यांना याचं फळ मिळालंय.
कॅनडाच्या ओंटरियो लॉटरी अँड गेमिंगने डेंग यांनी 437 कोटी रुपये जिंकल्याचं जाहीर केलंय. विशेष म्हणजे आपल्याला लॉटरीत इतकी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती या महिलेला आपल्या पतीकडूनच मिळाली. डेंग म्हणाल्या, 437 कोटी रुपये जिंकल्याची बातमी ऐकून मी खूप आनंदी आहे.
मला हे ऐकून अगदी रडूच आलं. सुरुवातीला तर माझा यावर विश्वासच बसला नाही. डेंग यांना नुकताच एका व्हर्च्युअल कार्यक्रमात आपल्या लॉटरीच्या रकमेचा चेक देण्यात आला. डेंग आता या पैशातून सर्वात आधी स्वतःचं एक घर खरेदी करणार आहेत. त्यानंतर त्यांचं दुसरं स्वप्न आहे या पैशातून जग फिरायचं.
डेंग 40 वर्षांपूर्वी आपल्या 14 भाऊ बहिणींसोबत अमेरिकेतील लाओसमधून कॅनडाला आल्या. त्यानंतर कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घ्यावी लागली. मात्र, या लॉटरीनं त्यांचं आयुष्यच बदललं आहे.