मुंबई – सोलापुरमधील राष्ट्रवादीचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता कॉंग्रेसचा हात धरला आहे.
मुंबईत कॉंग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख उपस्थित होते. यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, मी कृषिमंत्री असताना पहिल्यांदा धवलसिंह मोहिते पाटील यांना भेटलो. त्यांनी बिबट्या मारला हे आज कळले. जर कोणी चुकीचं वागलं त्याचा कार्यक्रम ते करतात. त्यांच्याकडं धाडस आणि विनम्रता आहे. साखर कारखाने संस्था हे कॉंग्रेस विचाराने झाले. मध्ये काही गोष्टी झाल्या इकडे तिकडे गेले पण पुन्हा स्वगृही आले आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तसा न्याय मिळाला नव्हता.
यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर डॉ. धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना गळाला लावले. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.