मुंबई : राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच ‘प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असे नाही’, या शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे.
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन त्यासंदर्भातील चौकशी तत्काळ सुरु करण्यात यावी.