रिपाइंची स्थायी समिती अध्यक्षांकडे मागणी
पुणे – करोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्य पुणेकरांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, अशा स्थितीतही लाखो पुणेकरांनी प्रामाणिकपणे कर भरत महापालिकेस आर्थिक हातभार लावला आहे. त्यामुळे नियमित करदात्यांवर करवाढीचा कोणताही बोजा टाकू नये, अशी मागणी माजी रिपाइंचे नगरसेवक आणि माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या आर्थिक संकटात महापालिका प्रशासनाने कर संकलन विभागाची थकबाकी सुमारे साडेपाच हजार कोटींच्या घरात गेली असून ती वसूल करून त्यातून करवाढीतून प्रस्तावित निधी संकलीत करावा, अशी मागणी धेंडे यांनी केली. याशिवाय, थकबाकी वसुलीसाठी सवलत दिल्यानंतरही अनेकजण थकबाकी भरत नसल्याने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी असेही, डॉ. धेंडे यांनी पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेचाही विरोध, आंदोलनाचा इशारा
महापालिकेच्या मिळकतकरामध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात 130 कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. करोनामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर करवाढीचा भुर्दंड लादणे चुकीचे आहे. याला शिवसेनेचा विरोध असल्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी स्पष्ट केले.