शास्तीकर थकबाकीधारकांना दिलेल्या जप्तीच्या नोटीस थांबवा

पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीची आयुक्तांकडे मागणी

निगडी – शहरातील ज्या मिळकतधारकांनी शास्ती भरलेली नाही त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शास्तीकर भरणे कामी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली आहे. आता कुठे करोना महामारीमुळे आलेल्या संकटातून नागरिक सावरत आहेत. त्यातच प्रशासनाकडून अशा पद्धतीने नोटीस पाठविल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

शास्तीकर थकबाकीधारकांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांचे वाटप तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समिती व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शास्तीकर थकबाकी शासन स्तरावर फेरविचारासाठी निर्णय प्रलंबित आहे. शासनाकडून निर्णय झालेला नसताना महापालिकेकडून अशाप्रकारे शास्तीकरधारकांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत.हे अत्यंत चुकीचे आहे. यातून एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून सदर नोटीस वाटपाचे काम थांबविण्यात यावे व वाटप केलेल्या नोटिसा परत घेण्यात याव्यात. असे न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात उपोषण तसेच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे व पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.