न्यूयॉर्क : अमेरिकेत झालेल्या हिंसाचारामुळे देशातील परिस्थिती अत्यंत तणावाखाली आहे. दरम्यान, हे वातावरण अजून निवळले नाही तोपर्यंत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जो बायडन यांच्या शपथविधीआधी ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसंच इतर ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. एफबीआयने यासंबंधी इशारा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
कॅपिटॉल इमारतीबाहेर झालेल्या हिंसाचारानंतर सतर्क असलेल्या एफबीआयने मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. वॉशिंग्टनला सुरक्षेसाठी जवळपास १५ हजार तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
जो बायडन यांच्या शपथविधीला ‘अमेरिका युनायटेड’ ही मुख्य संकल्पना असेल अशी माहिती त्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एफबीआयने १६ जानेवारी ते २० जानेवारी या कार्यकाळात हिंसक आंदोलनाची शक्यता व्यक्त केली असून शपथविधी झाल्यानंतर पुढील तीन दिवसांसाठीही हा इशारा कायम आहे.
नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये जवळपास १० हजार तुकड्या उपस्थित असतील. सुरक्षा, लॉजिस्टिक अशा गोष्टींसाठी मदत करण्यावर त्यांचा भर असेल. जर स्थानिक प्रशासनाने मागणी केली तर ही संख्या १५ हजारांपर्यंतही जाऊ शकते”.