सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन यांनी आवल्या अण्वस्त्रक्षमतेला पुन्हा समृद्ध करण्याचे सूतोवाच केले आहे. विकासित केल्या जात असलेल्या उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या शस्त्रास्त्र प्रणालीची यादी किम यांनी उघड केली आहे. ही अण्वस्त्रे यापुढील काळात अधिक वाढवण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
उत्तर कोरियावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांबाबत अमेरिका काय धोरण स्वीकारते, त्यावरच अमेरिकेबरोबरचे संबंध भविष्यात अवलंबून असतील, असे सांगून किम यांनी अमेरिकेबरोबरच्या संबंधांबाबतही भाष्य केले आहे.
उत्तर कोरियातील सत्तारुढ पक्षाच्या अधिवेशनकाळातच किम यांनी आपल्या देशाच्या भावी धोरनाबाबत् भाष्य केले आणि अण्वस्त्रक्षमता अधिक वाढवण्याचा इशाराही दिला आहे. अमेरिकेत भावी अध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसात अध्यक्षपदाची सूत्रे घेणार आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीनेच किम यांनी हा इशारा दिला आहे. बायडेन यांनी किम यांना उद्देशून “ठग’ असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी किम यांच्याबरोबर केलेल्या वाटाघाटींवरही टीका केली होती.
अमेरिकेकडून उत्तर कोरियाविरोधात जोपर्यंत अण्वस्त्रे वापरले जात नाहीत तोपर्यंत आपल्या अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आपला विचार नाही, असा गर्भित इशाराही किम जोंग उन यांनी दिला आहे. अमेरिकेबरोबरच्या चर्चेसाठी आपण तयार आहोत, मात्र उत्तर कोरियाला आपले लष्करी आणि आण्विक सामर्थ्य वाढवावेच लागेल. अमेरिका हा उत्तर कोरियाचा प्रमुख शत्रू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष कोणीही असले तरी त्या देशाचे धोरण कायमच राहणार असल्याचेही किम यांनी म्हटले आहे.