लंडन – फॉर्म्युला वन शर्यतीचा जगज्जेता लुईस हॅमिल्टन याला मानाचा सर हा किताब प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे आता तो सर लुईस हॅमिल्टन म्हणून ओळखला जाणार आहे.
मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या हॅमिल्टनचा ब्रिटनच्या राजघराण्याच्या वतीने नव्या वर्षी नाईटहूड सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. ब्रिटन राजघराण्याच्या वतीने दरवर्षाच्या अखेरीस कला, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.
फॉर्म्युला वन शर्यतीत सात जगज्जेतेपदानंतर लुईस हॅमिल्टनला सर या किताबाने सन्मानित करण्यात येत असतानाच 1966 च्या विश्वकरंडक फुटबॉल विजेत्या संघातील एकमेव हयात खेळाडू जिमी ग्रीव्हज यांना एमबीई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्याबाबतच सध्या वाद सुरू आहे.
इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये चेल्सी, टॉटेनहॅम आणि वेस्ट हॅम अशा विविध संघाकडून खेळताना 357 गोल, इंग्लंडसाठी 57 सामन्यात 44 गोल, 1966च्या विश्वकरंडक विजेत्या संघातील हयात सदस्य अशी सरस कामगिरी करूनही त्यांना सर किताब मिळालेला नाही यावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.