नवी दिल्ली – करोनाच्या साथीमुळे जवळपास 10 महिने थांबलेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सामने थायलंड खुल्या स्पर्धेने पुन्हा सुरू होणार आहेत. या स्पर्धेत ऑलिम्पिक रजतपदक विजेती पी. व्ही. सिंधूला सोपा तर, फुलराणी सायना नेहवालला खडतर ड्रॉ मिळाला आहे.
थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 12 ते 17 जानेवारी या कालावधीत होणार आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिंधूचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या अव्वल खेळाडू मिआ ब्लेशफेल्डशी तर, सायना सलामीलाच जपानची तिसरी मानांकित नोझोमी ओकुहाराशी लढणार आहे. या सामन्यात सायनाला बलाढ्य प्रतिस्पर्धी लाभल्याने अत्यंत सरस खेळ करावा लागणार आहे.
सिंधू आणि सायना या स्पर्धेनंतर 19 ते 24 जानेवारीदरम्यान होणाऱ्या टोयोटा थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होतील. मात्र, डेन्मार्क ओपन व सारलॉरलक्स ओपन या दोन स्पर्धामध्ये सहभागी होणार नाहीत. परंतु मार्चमध्ये होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत मात्र भाग घेणार आहेत.
पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणित व लक्ष्य सेन यांच्यासह एकूण सात भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या डेन्मार्क खुल्या स्पर्धेत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत श्रीकांतची सौरभ वर्माशी गाठ पडणार आहे. लक्ष्यचा सलामीला डेन्मार्कच्या रॅसमूस गेमकेशी सामना होईल, तर प्रणितची पहिली लढत कांटाफोन वॅंगचारोईनशी होईल.