जम्मू – जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात ताबारेषेजवळ सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा जप्त केला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू कश्मीर गझनवी फोर्सचे तीन सदस्यीय मोड्युल उद्ध्वस्त केल्यानंतर पूंछ जिल्ह्यात अशाप्रकारे शस्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा सापडण्याची ही तिसरी वेळ होती.
“एलएसी’जवळ बालाकोट भागात डब्बी गावात घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान हा शस्त्रसाठा आढळून आला. या शस्त्रसाठ्यामध्ये एक पिस्तुल, तीन मॅगझिन, 35 जिवंत काडतुसे आणि 5 हातबॉम्बचा समवेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बालकोट भागात 28 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून 6 हात बॉम्ब जप्त केले गेले होते. या तिघांकडे सखोल चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर आणि सुरक्षा दलांनी “एलएसी’च्या कुंपणाजवळच्या डब्बी गावात शोधमोहिम राबवली होती.
दुसरा शस्त्रसाठाही डब्बी गावातून जप्त केला गेला होता. त्यामध्ये दोन पिस्तुल, 70 काडतुसे आणि 2 ग्रेनेड जप्त केली गेली होती. आतापर्यंत जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये एकूण 13 ग्रेनेड, 3 पिस्तुल, 5 मॅगझीन, 105 काडतुसे, 4 पाकिस्तानी बलून, तेहरीक उल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ध्वज आणि जम्मू काश्मीऱ् गझनवी फोर्स या गटाच्या 18 पोस्टरचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स हा दहशतवादी गट पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून सक्रिय आहे. जम्मू काश्मीरमधील अरी आणि मेंधर भगातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करणे आणि जातीय तणाव वाढवण्याचे काम हा गट करत असतो, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.