कोल्हापूर (प्रतिनिधी) – पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 46 टक्के फेरीवाल्यांना कर्ज वितरण करुन कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना प्रत्येकी 10,000/- रुपये पथपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 6 हजार 610 पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून यापैकी आतापर्यंत 4 हजार 312 पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळून यापैकी 3 हजार 16 लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. यापैकी शहरातील बँकांनी जवळपास 1 हजार 276 जणांचे कर्ज मंजूर केले आहे.
राज्यात इतर सर्व महानगरपालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिका आघाडीवर असून आजअखेर महानगरपालिकेने दिलेल्या उदिृष्टापैकी सर्वात जास्त कर्जाचे वाटप केलेले आहे. याबाबत ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतू त्यांची कागदपत्रे अपूर्ण होती त्यांच्यासाठी शनिवार दि.2 जानेवारी 2021 रोजी शहरातील सर्व बँकामध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिका क्षेत्रात अधिक गतीने राबवून कोल्हापूर महानगरपालिका राज्यात आघाडीवर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतून महानगरपालिका क्षेत्रातील एकही पथविक्रेता वंचित राहू नये, यासाठी प्रशासक सर्वतोपरी मदत करेल असे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.