बंगळूर – कर्नाटकात पुन्हा राजकीय सनसनाटी निर्माण करणारा दावा सत्तारूढ भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी केला आहे. राज्यात संक्रांतीनंतर ऐतिहासिक बदल होतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना यत्नाल यांनी अनेकांच्या भुवया उंचावणारा दावा केला. मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल किंवा आणखी काही असेल. मात्र, ऐतिहासिक बदलांची शक्यता आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कर्नाटकात मुख्यमंत्रीबदलाचे अंदाज वर्तवणारे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
येडियुरप्पा फार काळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असा दावा याआधी यत्नाल यांनी केला होता. त्यामुळे त्यांचे नवे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. येडियुरप्पा यांच्यावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नाराज आहे.
त्यांना बदलण्याचा विचार सुरू आहे, अशा आशयाच्या बातम्या वारंवार येत असतात. कर्नाटक भाजपकडून त्या बातम्या वारंवार फेटाळल्या जात आहेत. मात्र, यत्नाल यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेही सूचित होत आहे.