नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देशभरात एकाचवेळी सर्व निवडणुका एकत्रितपणे घेण्याची आग्रही भूमिका मांडली जात आहे. आता त्या वन नेशन, वन इलेक्शन संकल्पनेसाठी मोहीम हाती घेण्याचे भाजपने ठरवले आहे.
एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशातून भाजप चालू महिन्याच्या अखेरपर्यंत 25 वेबिनार्सचे आयोजन करणार आहे. त्या ऑनलाईन परिसंवादांमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच कायदेतज्ञ सहभागी होणार आहेत. पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यापासून मोदी यांनी अनेकदा एकत्रित निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
देशात एकाचवेळी लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची गरज ते अधोरेखित करत आहेत. देशभरात वारंवार या ना त्या निवडणुका होतात. त्यासाठी लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात. एकत्रित निवडणुका झाल्यास विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल, अशी त्यांची भूमिका आहे.
मात्र, विविध कारणांवरून मुदतपूर्व निवडणुका घेण्याची वेळ येते. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन संकल्पना कशी काय प्रत्यक्षात येणार, असे प्रश्नचिन्ह विविध घटकांकडून त्या भूमिकेवर उपस्थित केले जात आहे.