पुणे – तहसिलदाराकडून काम करून देतो, असे सांगत सहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या खासगी व्यक्तीला सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा.फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. चार महिने विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. तपास पूर्ण झाला आहे. मोरे याला जामीन देण्याची मागणी ऍड. पुष्कर दुर्गे यांनी न्यायालयात केली.
या प्रकरणात मोरेसह गुंजाळ नावाच्या व्यक्तीविरुद्ध (पुर्ण नाव माहित नाही) गुन्हा दाखल आहे. तक्रारदार यांची फुरसुंगी गावात जमीन आहे. त्यांच्या जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण तहसील हवेली कार्यालय येथे प्रलंबीत आहे. या प्रकरणात तहसिलदारांकडून काम करून देण्याच्या अमिषाने लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना मोरे याने जामिनासाठी अर्ज केला. जानेवारी अखेरपर्यंत दर गुरूवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या आणि तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर हा निकाल देण्यात आला आहे.